बीव्हीजी हेरिटेज वॉक - 49
27-01-2023
विष्णू मंदिर - बेलबाग
मार्गदर्शक : श्री. मंदार लवाटे
पेशवेकालीन कलास्थापत्याचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध असलेले बेलबागेतील विष्णू मंदिर येथे २७ जानेवारी, शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजता हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रसिध्द मोडी अभ्यासक आणि इतिहास तज्ञ श्री. मंदार लवाटे उपस्थितांस मार्गदर्शन करतील.
मनिस मळा या नावाने ओळखल्या जाणार्या या ठिकाणी पूर्वी बेलाची अनेक झाडे असलेली बाग असल्यामूळे तिला बेलबाग हे नाव पडले. १७६५ मध्ये नाना फडणवीसांनी येथे २५ हजार रुपये खर्चून मंदिर बांधायला सुरुवात केली. चार वर्षांनी म्हणजे १७६९ मध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. भगवान विष्णु हे या मंदिरातील आराध्य दैवत.
या मंदिराचे गर्भगृह घडीव दगडांचे बांधलेले असून त्यावर मराठा वास्तु शैलीचे वैशिष्ट्य असलेला शंक्वाकृती शिखर आहे. तसेच छत लाकडी असून त्यावर कोरीवकाम केलेले आहे. या शंक्वाकृती शिखरावर कळस असून त्यावर दोन कमलपुष्प दलांनी युक्त दोन घुमट आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस गरूड मंडप आहे. हिंदू, बौद्ध व जैन पुराणांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला गरुड पक्षी भगवान विष्णुंचे वाहन आहे. या मंदिरात श्री गणेश व कामेश्वर (शंकराचे एक रुप) यांसह अनेक देवतांच्या मूर्ती आहेत. यापैकी सर्वात महत्त्वाची म्हणजे चांदीचे नक्षीकाम केलेल्या आकृतिबंधासमोरील दोन फूट उंच भगवान विष्णु व देवी लक्ष्मी यांची मूर्ती. याशिवाय इतर देवतांचीही छोटी मंदिरे याठिकाणी पहावयास मिळतात. पेशवेकाळातील प्रगल्भ स्थापत्याचे आदर्श उदाहरण म्हणजे हे बेलबागेतील विष्णू मंदिर आहे. याप्रसंगी नाना फडणीस यांचे वंशज श्री अशोक फडणीस हेही श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत .
विष्णू मंदिर - बेलबाग : गुगल लोकेशन