बीव्हीजी हेरिटेज वॉक - 33
07-10-2023
सारसबाग
मार्गदर्शन : श्री. मंदार लवाटे
तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता.
इतिहासाचे अभ्यासक आणि मोडीचे जाणकार श्री. मंदार लवाटे याप्रसंगी माहिती देणार आहेत. श्री. मंदार लवाटे हे भारत इतिहास संशोधक मंडळाचे विश्वस्त आहेत. त्यांचे आतापर्यंत ४०० हून जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांची पुण्यातली गणपती मंदिरे, पुण्यातील अनंत चतुर्दशी - उत्सव १२१ वर्षांचा इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. याप्रसंगी मराठ्यांचा जरीपटका या दुर्लक्षित विषयावर लवाटे माहिती देणार आहेत.
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढ्याच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्यानंतर या बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक 'सारसबाग' असे नाव ठेवले. नंतर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली.
वॉकच्या निमित्ताने सारसबागेची माहिती लोकांना सांगण्यात येईल.
सारसबाग- गुगल लोकेशन