बीव्हीजी हेरिटेज वॉक - 24
30-07-2023
विज्ञान आश्रम, पाबळ
मार्गदर्शन : श्री योगेश कुलकर्णी
विज्ञान आश्रम : पुणे जिल्ह्यातील पाबळ गावातील एक शैक्षणिक संस्था आहे. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग हे या संस्थेचे संस्थापक आहे.ते हिंदुस्थान लिव्हर या प्रसिद्ध कंपनीच्या ‘इंजिनिअरिंग सायन्स’ विभागाचे प्रमुख होते. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी १९८३ च्या सुमारास विज्ञान आश्रम सुरू केला. अनेक मुले, त्यांनी शाळा सोडली असली तरी, जीवनात यशस्वी होतात. ती काम करत करतच शिकतात. याचाच अर्थ काम करत करत शिकणे ही शिकण्याची नैसर्गिक पद्धत आहे. समाजातील जास्तीत जास्त मुले अशा प्रकारे शिकत असतील तर शिकण्याची हीच मुख्य पद्धत हवी, या विचारातून डॉक्टरांनी विज्ञान आश्रमाची स्थापना केली. त्यांनी ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांच्याशी चर्चा केली. भारतातील एक प्रातिनिधिक खेडे म्हणून पाबळ हे खेडे निवडले आणि येथे हा आश्रम सुरू झाला. पुढे इथेच खऱ्या शिक्षणाचा इतिहास घडला. आश्रमाच्या शिक्षण पद्धतीमुळे, रूढार्थाने हुशार नसलेली अनेक मुले उद्योजक बनतात. डॉ. श्रीनाथ शेषगिरी कलबाग नंतर विज्ञान आश्रम हे मीरा कलबाग(अम्मा) म्हणजेच त्यांच्या पत्नी यांनी संभाळल. पण १८ मार्च २०१६ला त्याचं निधन झाले. आता पूर्ण विज्ञान आश्रम हे डॉ.योगेश कुलकर्णी हे पाहतात. योगेश कुलकर्णी हे विज्ञान आश्रमचे कार्यकारी संचालक आहेत.
‘शिकायचे ते हाताने काम करतच’ हे आश्रमाचे मुख्य ब्रीद आहे. येथील अभ्यासक्रमात शेती-पशुपालन, अन्नप्रक्रिया, प्रयोगशाळेतील चाच्ण्या आदींचा समावेश असलेला गृह व आरोग्यज्ञान विभाग, फॅब्रिकेशन, बांधकाम, सुतारकाम आदींचा समावेश असलेला अभियांत्रिकी विभाग, तर सौरऊर्जा, जैविक तंत्रज्ञान, आदींचा समावेश असलेले ऊर्जा-पर्यावरण असे वेगवेगळे विभाग आहेत. ‘विज्ञान आश्रमा’तील विद्यार्थी तंत्रज्ञानावर आधारलेले विविध प्रकल्प प्रत्यक्ष काम करत शिकतात. सोलर दिवे तयार करणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांसारखी तंत्रे वापरून शेती उत्पादन घेणे, बांधकामाची नवीन तंत्रे वापरून शिकणे, खाद्य पदार्थांची निर्मिती करणे आदी बाबी ते काम करता करता शिकतात. शिक्षण म्हणजे व्यवसाय शिक्षण आहे. मात्र, एखादे काम करताना विद्यार्थ्यांना त्याच्या अनुषंगाने विविध विषयांतील संकल्पनांची ओळख करून देण्यावर तेथे भर दिला जातो. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल उपकरणांची दुरुस्ती करताना भौतिकशास्त्रातील संकल्पना शिकता येतात. शेतीत पीक घेताना जीवशास्त्र, गणित आदी अनेक विषयांतील कल्पना सहजपणे शिकता येतात. काम करता करता संकल्पना स्पष्ट करून शिकवले, की ते विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटत नाही. नेहमीच्या पुस्तककेंद्री शिक्षणात ज्यांना रुची नाही आणि त्यामुळे जे शैक्षणिक प्रगती करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना घेऊन ‘विज्ञान आश्रमा’ने ही संकल्पना सिद्ध केली आहे. तेथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेले शेकडोजण स्वतःचे व्यवसाय करत आहेत.
याच प्रसंगी श्रीमंत बाईसाहेब मस्तानी यांचे समाधिस्थळासही भेट देण्यात आली. मस्तानीचे समाधिस्थळ असलेले पाबळ गाव हे पुण्याजवळ आहे. समाधीची काळजी मस्तानीचे वंशज मोहम्मद इनामदार ह्यांच्याकडून घेतली जाते. १७४०मध्ये बाजीराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर मस्तानीने हिरा गिळून आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. पाबळ येथे तिचे दफन करण्यात आले. तो हिरा मिळवण्यासाठी व काही दागदागिने मिळतील या हेतूने १९९७-१९९८ व त्यानंतर जानेवारी २००९मध्ये अज्ञात चोरट्यांनी कबरीचे खोदकाम केले. साधारण ६ फूट खोल कबर खोदून चोरट्यांनी हा प्रकार केला. त्यांच्या हाती काही लागले नाही, पण कबरीची मोडतोड झाली. यानंतर पुरातत्त्व खात्याने किरकोळ डागडुजी करून कबर पुन्हा उभी केली खरी, पण मोडकळीस आलेल्या भिंती, परिसरात उगवलेले गवत यामुळे कबरीची सारी लयाच गेली आहे. मस्तानीचे स्मारक हा ऐतिहासिक ठेवा असल्याने ही वास्तू संरक्षित करण्याबाबत शासनाने एक ठराव केला होता. राजपत्रात हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पाबळ येथील मस्तानीची कबर संरक्षित स्मारक राहील व त्याची देखभाल पुरातत्त्व विभाग करेल, असा निर्णय झाला; पण अद्यापची त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मस्तानी राहत असलेली जागा भुईसपाट झाली असून, आठ गढी असलेल्या महालाचा शेवटचा बुरूज २००१मध्ये सपाट झाला. या ठिकाणी 'मस्तानी गार्डन' उभारण्याचा मानस येथील मस्तानी फाउंडेशनने हाती घेतला आहे.
सौजन्य : विकिपीडिया
विज्ञान आश्रम, पाबळ गुगल लोकेशन