बीव्हीजी हेरिटेज वॉक - 13
14-05-2023
तुळशीबाग श्रीराम मंदिर
मार्गदर्शन : श्री सुप्रसाद पुराणिक
||श्रीरामाच्या मूर्ती तुळशीबागेमध्ये कशा रमल्या I
ज्याला त्याला पावती श्रीमंतांच्या मनामध्ये भरल्या II
अशा ओळी तुळशीबागेतील श्रीमंत नारो अप्पाजी खिरे यांनी स्थापिलेल्या पेशवेकालीन राम मंदिरातील सभामंडपात उभे राहिल्यावर पहायला मिळतात. या मंदिराचा इतिहास वारसाप्रेमींना येत्या रविवारी १४ मे रोजी सकाळी ८:०० वाजता हेरिटेज वॉकच्या माध्यमाने अनुभवता येईल.
सुप्रसाद पुराणिक हे या मंदिर परिसराची माहिती देणार आहेत. सुप्रसाद सुहास पुराणिक हे प्रिंटिंग इंजिनियरींग (B.E. in Printing Engineering & Graphics Communication) मध्ये पदवीधर आहेत. त्यांनी 'नावामागे दडलयं काय?' आणि 'पुण्याचे सुखकर्ता' ही दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी विविध वृत्तपत्रे व मासिके यांमधून पुणे शहराच्या इतिहासावर १०० पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत व १० व्याख्याने दिली आहेत. तसेच मोडी कागदपत्रांचा विशेष अभ्यास त्यांनी केला आहे.
१७९५ मध्ये तुळशीबागेतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले. सरदार खाजगीवाल्यांच्या बागेतील एक एकराचा तुकडा घेऊन तेथे नारो अप्पाजी यांनी राममंदिर बांधले, म्हणून त्या परिसराला 'तुळशीबाग' असे नाव मिळाले. या मंदिरासमोर हात जोडून उभा असलेला मारुती, उजव्या बाजूस गणपती, डाव्या बाजूस काशीविश्वेश्वर म्हणजेच महादेवाचे मंदिर आहे. शिवाय मंदिराच्या मागच्या बाजूची कोरीवकाम केलेली काळ्या पाषाणातली शेषशायी विष्णू मूर्ती आवर्जून बघण्याजोगी आहे. विठ्ठल-रखुमाई, दत्त-बालाजीसह दोन देवी , खरकट्या मारुती यांचीदेखील येथे मंदिरे आहेत. दत्तमूर्ती खाली नारो अप्पाजींच्या घराण्यातील एकाची समाधी पहायला मिळते. मंदिराला पूर्व दिशा सोडून उर्वरित तीन दिशांना प्रवेशद्वारे आहेत.
गुगल लोकेशन
https://goo.gl/maps/kfHDEWug3egBmrf26